पादचारी दिन कशाला?

समाजात ज्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधून उपाययोजना करणे आवश्यक आहे अशा घटकांसाठी वेगवेगळे ’दिन’ साजरे केले जातात.  त्यांचा बर्‍याच प्रमाणात उपयोग होतानाही दिसून येतो.  परंतु दुर्दैवाने ’पादचारी दिन’ भारतातच नव्हे, तर जगातही फारसा कोठे साजरा होत असल्याचे ऐकिवात नाही.  असा दिन साजरा केल्यास त्यामुळे पादचार्‍यांच्या समस्या सोडवण्यास चालना मिळेल.  हे लक्षात घेऊन पुण्याचे मा. महापौर श्री. मुरलीधर मोहोळ ह्यांनी ११ डिसेंबर हा पुण्यात ’पादचारी दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

पादचारी दिन कसा साजरा करायचा?

पादचारी दिन साजरा करण्यासाठी आपल्याला अनेक उपक्रम करता येतील. पादचार्‍यांसाठी चांगलं काय आहे ते दाखवू या, त्यांच्या समस्या देखील मांडू या! खाली काही उपक्रम केवळ वानगीदाखल सुचवले आहेत. आपापल्या कल्पनाशक्तीनुसार आपण इतरही उपक्रम करू शकता!  त्यासाठी खालीलपैकी कोणतेही बोधचिन्ह (Logo) वापरावे.

क्र. उपक्रमाचा तपशील कोण करू शकेल?
१. झेब्रा पट्ट्यांमागे थांबणार्‍या वाहनचालकांना गुलाबपुष्प. रोटरी, महाविद्यालये, राजकीय पक्ष
२. कार्यालयांमध्ये ’Walk to work'. २ किमी किंवा त्याहून अधिक अंतरावरून रोज चालत येणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार. खाजगी कंपन्या
३. चित्रकला / निबंध स्पर्धा. प्रसारमाध्यमे
४. झेब्रा पट्ट्यांमागे न थांबणार्‍या वाहनचालकांवर कारवाई. ती सतत सुरू ठेवण्याचे जाहीर आश्वासन. वाहतूक पोलीस
५. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसमवेत चाकाच्या खुर्चीवरून सुमारे १०० मीटरवरील दुकानात जाणे. ते करताना येणार्‍या अडचणींची नोंद घेऊन शहरभर तशा सुधारणा करण्याचे ठरवणे. स्वयंसेवी संघटना, महानगरपालिका
६. मा. महापौर, मा. आयुक्त, मा. मुख्य अभियंता (पथ विभाग) ह्यांची सुमारे १ किमीची ’पदपथयात्रा’. पदपथावरून चालताना येणार्‍या अडचणींची नोंद घेऊन शहरभर तशा सुधारणा करण्याचे ठरवणे. स्वयंसेवी संघटना, महानगरपालिका
७. नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये कमीत कमी ५०० मी रस्ते एक दिवस ‘वाहनमुक्त’ करणे. नगरसेवक
८. पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी सर्वात सुस्थितीतील झेब्रा व पादचारी सिग्नल असलेल्या ३ चौकांचे सुशोभीकरण. महानगरपालिका
९. पुणे शहराचा 'walkability score' जाहीर करणे. मा. महापौर / मा. आयुक्त

महत्त्वाचे-
वरील कल्पना केवळ उदाहरण म्हणून दिल्या आहेत. नवनवीन कल्पनांचे स्वागतच आहे. ’पादचार्‍यांचे हित जपणे आवश्यक आहे’ असा संदेश देणारा कोणताही उपक्रम आपण करू शकता!